मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 31 डिसेंबर 2026 पूर्वी निवडणुका पार पाडण्याचे आवाहन निवडणूक आयोगासमोर आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. 10 नोव्हेंबर पासून यासाठी उमेदवारी अर्ज भरता येणार असून 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.
नगरपालिका निवडणूक कार्यक्रम :
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात : 10 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट : 17 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवट : 21 नोव्हेंबर
उमेदवारांना चिन्ह वाटप : 26 नोव्हेंबर
नगर परिषद निवडणूक मतदान दिनांक : 2 डिसेंबर
निवडणूक निकाल दिनांक : 3 डिसेंबर
या पुढच्या टप्प्यांमध्ये राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील लवकरच पार पडणार आहेत. राज्यातील विरोधी पक्षांकडून सातत्याने मतदार यादी बाबतच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जात असताना राज्य निवडणूक आयोगाने देखील त्याबाबत माहिती आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
दुबार मतदारांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येत असून दुबार नोंदणी असलेल्या मतदारांच्या नावापुढे चिन्हांकित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या मतदारांना केवळ एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.









