तुळजापूरच्या विकासासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे योगदान ऐतिहासिक आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली. गुरूवारी (दि.७) तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या ऐतिहासिक विकासासाठी महायुती सरकारकडून मंजूर झालेल्या निधीच्या पार्श्वभूमीवर मंत्री बावनकुळे आणि आ. पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मित्रचे उपाध्यक्ष तथा आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा मठाधिपती व महसूल मंत्री यांच्या हस्ते मानपत्र देवुन, फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.यावेळी बावनकुळे बोलत होते.
या कार्यक्रमास मठाधीपती चिलोजीबुवा, महत इछागिरी महाराज, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत व्यंकट अरण्य महाराज, गुरू महंत वाकोजीबुवा, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी जि.प. उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, भाजपा जिल्हाध्यक्षा दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड. मिलिंद पाटील, विनोद गंगणे, सचिन रोचकरी, विजय गंगणे, सुनिल चव्हाण, संजय कौडगे, नितीन काळे, माजी जिप अध्यक्ष नेताजी पाटील, मजूर फेडरेशनचे चेअरमन सतिश दंडनायक, नारायण नन्नवरे, पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जन साळुंके, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, उपाध्य मंडळ अध्यक्ष अनंत कोडो, अँड. अशिष सोनटक्के, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब शामराज, शांताराम पेंदे, गुलचंद व्यवहारे, प्रकाश मगर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बावनकुळे म्हणाले, आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. मी जेव्हा हा विकास आराखडा पाहिला, तेव्हा आम्ही सर्वजण बसलो होतो. त्यावेळी आमच्या अंगावर शहारे येतील, इतकं सुंदर कार्य या ठिकाणी केले जाणार आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. हा विकास आराखडा मंजूर झाल्यामुळे तुळजापूर शहरात मोठा उत्साह आहे. या निधीमुळे मंदिराच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ होऊन भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील”, असे बोललं जात आहे.
आमदार पाटील लवकरच मंत्री होतील – बावनकुळेंचे सूचक वक्तव्य
आई तुळजाभवानीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेल की, राणाजगजितसिंह पाटील यांना मंत्री करा, आणि ते नक्कीच मंत्री होतील असा ठाम विश्वास व्यक्त करत तुळजापूरच्या विकासासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे योगदान ऐतिहासिक आहे असे वक्तव्य बावनकुळे यांनी व्यासपीठावरून केले.
तुळजापुरचे धार्मिक, आर्थिक, पर्यटन महत्व वाढणार- आमदार राणाजगजितसिंह पाटील
यावेळी बोलताना आ. राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, २१ वर्षांपूर्वी मी राज्यमंत्री झाल्यानंतर आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यायला आलो होतो, त्यावेळी हा संपूर्ण परिसर बघितला आणि या परिसरासाठी विकास आराखडा तयार केला आणि त्याचं सादरीकरण मंत्रालयात केलं. २१ वर्षापूर्वी मनामध्ये जे होतं ते विकास आराखडा मंजूर झाल्यामुळे तुळजापूरचा कायापालट करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र तुळजापुरचा कायापालट करण्याचा संकल्प आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि २०१९ मध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी तिर्थक्षेत्र विकासाबाबत दिलेले आश्वासन आम्ही पाळत आहोत. सध्या तिर्थक्षेत्र तुळजापूरमध्ये १८६५ कोटी रुपयांच्या विकासकामांवर काम सुरू असून, या कामांमुळे तुळजापुरचे धार्मिक, आर्थिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढणार आहे.
तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा नेमका कसा?
दरम्यान महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आगामी नवरात्र उत्सवात होणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत ठरल्यानुसार, या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने आणि देशभरातून येणाऱ्या सुमारे १ ते १.५ कोटी भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी हा १,८६५ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यामध्ये मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराच्या विकासाशी संबंधित सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही या बैठकीत नमूद करण्यात आले आहे.