मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले असून यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षणाशिवाय मागे हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर आता मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे मैदानामध्ये उतरले आहेत.(Chagan Bhujbal on reservation)
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यामुळे ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार विरोध दर्शवला आहे. जालना जिल्ह्यात येत्या 1 सप्टेंबरपासून ओबीसी संघटना आपले उपोषण चालू करणार आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अखेर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची एकत्रित बैठक बोलावून हालचाली सुरु केल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बोलावले आहे. 1 सप्टेंबर रोजी ओबीसी नेत्यांनी मुंबईत यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे, असा संदेश भुजबळ यांनी दिला आहे. मात्र मराठा समाज देखील मुंबईमध्ये जमा झाला आहे. तर आता छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी समाजाची बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे. यामुळे मुंबईमध्ये आरक्षणावरुन वातावरण तापले आहे.