जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये स्थायी आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी पुढील चार महिन्यात ३५० आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक गरजांची पूर्तता अधिक प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला तसे निर्देश दिले आहेत. आरोग्य शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.(Dharashiv hodpital 350 health camp)
स्थायी आरोग्य सेवा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात महिन्यातून किमान एक तरी आरोग्य शिबीर आयोजित करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आमदार पाटील यांनी हाती घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
३५० शिबीरांमध्ये गंभीर आजार आढळलेल्या रुग्णांवर पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया होईपर्यंत त्याचा उपलब्ध तंत्रज्ञ वापरून पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले होते.
सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयामार्फत राबविण्यात येत असलेली ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र नसलेल्या प्रत्येक गावात आता अंमलात आणली जाणार आहे. यासाठी किमान २० मोबाईल दवाखाना एम्बुलेंस आवश्यक असून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची चर्चाही यावेळी करण्यात आली. सध्या जिल्ह्यात या प्रकारच्या तीन मोबाईल व्हॅन उपलब्ध आहेत.
आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून एका कुटूंबासाठी ५ लाखापर्यंतचे मोफत औषधोपचार केले जातात. आरोग्य शिबीरादरम्यान आयुष्यमान कार्डविषयी जनजागृती करून जास्तीत जास्त कुटूंबाचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याच्या सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच रुग्णांचा डिजीटाईज्ड डेटा तयार करण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. पुढील वर्षभरात जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. एल. हरिदास यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णांची तपासणी करणे प्राथमिक उपचार देणे व पुढील उपचाराची गरज असलेले रुग्ण शोधणे या बाबींवर भर दिला जाणार आहे. रुग्ण पुढील उपचारासाठी गरजेनुसार जिल्हा स्तरावरील शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, AIIMS तसेच इतर रुग्णालयामध्ये पाठविण्याची प्रक्रिया करण्यात येईल असेही बैठकीत ठरले आहे. यासाठी तपासण्यात येणाऱ्या रुग्णांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करणे गरजेचे आहे. यातून रुग्णांची माहिती, तपासणी रेकॉर्ड, तसेच पुढील उपचार पद्धतीवर लक्ष देणे शक्य होणार आहे. याबाबत सर्वांशी चर्चा करून बैठकीत प्राथमिक नियोजन करण्यात आलेले आहे.