अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पीक विम्याच्या अनुषंगाने मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. या माध्यमातून निष्पन्न झालेल्या उत्पादना आधारे विमा नुकसान भरपाई निश्चित केली जाते, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्याकडे सतर्कतेने लक्ष द्यावे, असे आवाहन मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.(Mla Ranajagjitsinha patil on farmers assistance)
सध्या धाराशिव जिल्ह्यात मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरु झाले आहेत. जिल्ह्यात 35316 शेतकरी अर्जाद्वारे 14998 हे क्षेत्राचा उडीद पिकाचा व 9208 शेतकरी अर्जाद्वारे 2560 हे क्षेत्राचा मूग पिकाचा विमा हप्ता भरला आहे. त्यामुळे मूग व उडीद उत्पादक शेतकरी बांधवांनी अधिक जागरूकपणे या सगळ्या बाबींकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 160 टक्क्यांहुन अधिक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने राज्याचे कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन निश्चित करून त्याप्रमाणे विमा नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते. त्यामुळे या प्रक्रियेवर सर्वांनीच अधिक सतर्क होऊन लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मूग व उडीद पिकांचे पीक कापणी प्रयोग हे मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, शेतकरी प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केले जात आहेत. या प्रयोगाद्वारेच निष्पन्न उत्पन्नाच्या आधारे पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्वपूर्ण असून शेतकरी प्रतिनिधी यांनी या प्रक्रियेवर लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.