कौडगाव, वडगाव, होर्टी येथील एमआयडीच्या कामांना आता मोठी गती मिळाली आहे. वडगाव येथील ८०.४६ हेक्टर जागा एमआयडीसीच्या ताब्यात आली आहे. पुढील आठवडाभरात येथील पायाभूत विकास कामाची निविदा जाहीर होईल. देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल प्रकल्प उभारणीसाठी अत्यावश्यक असलेल्या पायाभूत कामांनाही आता गती लाभली आहे. १७ कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते, वीज, पाणीपुरवठा यांसारख्या विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. या सर्व औद्योगिक वसाहतींच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी २५ हजार रोजगार निर्मितीचे आपले उद्दीष्ट असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ‘ मित्र’चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत होर्टी, वडगाव कौडगाव, वाशी, शिराढोण येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
परिसरातील स्थानिक युवकांना त्याच परिसरात हक्काचा रोजगार उपलब्ध होणार
होर्टी येथे २०.२० हेक्टर क्षेत्र एमआयडीसीच्या ताब्यात आलेले आहे. त्याव्यतिरिक्त आणखी काही जागा त्या परिसरात उपलब्ध होऊ शकेल काय? याबाबत तेथील उपविभागीय अधिकाऱ्यांना आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आणखी जागा उपलब्ध झाल्यास त्या ठिकाणी एक विस्तृत आणि व्यापक एमआयडीसी उभारली जाणार आहे. जेणेकरून त्या परिसरातील स्थानिक युवकांना त्याच परिसरात हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव येथे ८०.४६ हेक्टर जमीन सध्या एमआयडीसीच्या ताब्यात मिळाली आहे. तेथील लेआउटच्या नियोजनाचे कामही मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानुसार आता वडगाव एमआयडीसीमध्ये आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी सुविधांसाठी विकास कामे हाती घेतली जाणार आहेत.
देशातील पहिल्या स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची उभारणी
वाशी तालुक्यातील फटाका उद्योगांना अधिक सक्षम आणि रोजगारक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही आता यश आले आहे. मराठवाड्याची शिवकाशी अशी ख्याती असलेल्या तेरखेडा फटाका उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरक्षित आणि शाश्वत रोजगाराच्या आणखी मोठ्या संधी त्या परिसरातील होतकरू युवक युवतींसाठी उपलब्ध होणार आहेत. देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क कौडगाव येथे एमआयडीसीच्या माध्यमातूनच सुरू केला जाणार आहे.
१७ कोटी रुपयांच्या पायाभूत सोयी सुविधा विकसित करण्याचे काम सुरु
आपल्या महायुती सरकारने त्याला अनुमती दिली आहे. त्यासाठी १७ कोटी रुपयांच्या पायाभूत सोयी सुविधा विकसित करण्याचे कामही सध्या सुरू आहे. यात चार किलोमीटर अंतराचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. एकूण चार रस्त्यांपैकी दोन रस्त्यांची कामे वेगात सुरू असून उर्वरित दोन कामेही लवकरच पूर्ण होतील. एकट्या कौडगाव एमआयडीसीत प्रस्तावित असलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल प्रकल्पाच्या माध्यमातून दहा हजाराहून अधिक रोजगार निर्माण होईल या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मोठे सहकार्य आपल्याला लाभत असल्याचे राणाजगजीतसिंह पाटील यांनी म्हटले आहे.