धाराशिव : जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मदतीतून ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत धाराशिव जिल्ह्याला मिळणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेत महायुती सरकारने राज्यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये धाराशिव जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी तब्बल ७५० कोटी रुपयांपेक्षा अधिकची नुकसानभरपाई मिळणार आहे. या मदतीपैकी १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे प्रमाण अभूतपूर्व असल्याने, यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई कधीच मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळे पिकांचे, जनावरांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे भरीव मदत मिळण्याची मागणी करण्यात येत होती. या मदतीमुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.








