मराठवाड्यात ४,५०० आसनांच्या अभ्यासिकांची मागणी!
आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा पुढाकार
मुख्यमंत्र्यांसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा!
धाराशिव : मराठवाड्यातील ग्रामीण, सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी त्यांच्या जिल्ह्यातच दर्जेदार व अत्याधुनिक अभ्यास सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्हा मुख्यालयांत एकूण ४,५०० विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विशेष म्हणजे, या मागणीसाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनाही स्वतंत्रपणे पत्रे देऊन संबंधित जिल्ह्यांत अभ्यासिका उभारण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती पाटील यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एकावेळी १,००० विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल, अशी भव्य अभ्यासिका उभारावी. तसेच जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या सात जिल्हा मुख्यालयांत प्रत्येकी ५०० आसनक्षमतेच्या सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका उभारण्यात याव्यात, अशी मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली आहे.
मराठवाड्यातील हजारो युवक-युवती एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती तसेच विविध शासकीय व निमशासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या घरी शांत अभ्यासाचे वातावरण, आवश्यक संदर्भ ग्रंथ आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नसतात. खासगी अभ्यासिकांचे शुल्क तसेच मोठ्या शहरांमध्ये राहण्याचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयातच सुसज्ज सार्वजनिक अभ्यासिका उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
प्रस्तावित अभ्यासिकांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ, अद्ययावत ग्रंथसंपदा, इंटरनेटसह डिजिटल अभ्यास सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांगसुलभ प्रवेश तसेच विद्यार्थिनींसह सर्व विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित महानगरपालिका किंवा नगर परिषदेच्या ताब्यातील योग्य जागा अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून द्यावी. जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्हानिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक तयार करावे. यामध्ये इमारत बांधकाम, ग्रंथसंपदा, डिजिटल सुविधा तसेच अभ्यासिकांच्या नियमित संचालन व देखभालीसाठी आवश्यक तरतुदींचा समावेश असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सर्व आठही जिल्ह्यांतील प्रस्ताव संबंधित जिल्हा नियोजन समित्यांच्या आगामी बैठकीत प्राधान्याने ठेवण्यात यावेत. अभ्यासिका उभारणीसाठी पात्र योजनेअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी केवळ मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून न थांबता आमदार डॉ. पाटील यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला आहे. प्रत्येक पालकमंत्र्याने आपल्या जिल्ह्यात अभ्यासिका उभारण्यासाठी आवश्यक जागा, निधी आणि प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.





