तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांकडून विविध स्वरूपात दान अर्पण करण्यात येते. याच भक्तिभावातून पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भाविक अलका राक्षे यांनी मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी देवीच्या चरणी ९८९ ग्रॅम वजनाची चांदीची समई अर्पण केली.
अलका राक्षे यांनी आपल्या कुटुंबीयांसह श्री क्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीप्रती असलेल्या श्रद्धा आणि भक्तिभावातून चांदीची समई अर्पण केली.
अर्पण करण्यात आलेल्या या चांदीच्या समईची श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक कार्यालयात अधिकृत नोंद करण्यात आली. त्यानंतर सदर समई मंदिर संस्थानकडे नियमानुसार जमा करण्यात आली.
याप्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी देणगीदार भाविक अलका राक्षे व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार केला.
यावेळी पुजारी नंदू गंगणे यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुजारी बांधव उपस्थित होते.



