तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रामाणिकपणाचे कौतुक
तुळजापूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशातच सहकुटुंब देवीच्या दर्शनासाठी आलेल्या विजय आडम यांचे हरवलेले पाकीट प्रामाणिकपणे परत करून BVG कर्मचाऱ्याने माणुसकी आणि प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.
शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) भवानी रोड येथे ई-रिक्षा चालविणारे BVG कर्मचारी निखिल नागनाथ गोडवे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना एक पाकीट आढळून आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता याबाबत BVG सुपरवायझर सचिन पवार यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित मालकाची ओळख पटविण्यात आली आणि विजय आडम यांना ते सुरक्षितपणे परत करण्यात आले.
या पाकिटात रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती. हरवलेले पाकीट सुखरूप परत मिळाल्याने विजय आडम यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, निखिल गोडवे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने कौतुक करण्यात आले. त्यांच्या या कृतीतून भाविकांच्या सेवेसोबतच प्रामाणिकपणाचेही दर्शन घडले.


