जिल्हाधिकारी पुजार थेट वस्तीवर!
धाराशिव : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि माणुसकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण. मात्र, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या अनेक कुटुंबांच्या आयुष्यात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आणि उदरनिर्वाहाच्या संघर्षाचा अंधार कायम आहे. अशा परिस्थितीत कळंब तालुक्यातील पानगाव येथील पारधी वस्तीवर दिवाळीच्या निमित्ताने एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी थेट पारधी वस्तीवर पोहोचून तेथील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या समस्या आपुलकीने जाणून घेतल्या. हक्काचा निवारा, पिण्याचे पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करून तातडीने निवारण करण्याची ग्वाही दिली. प्रशासनाच्या या संवेदनशील भेटीमुळे पारधी बांधवांच्या मनात विश्वास निर्माण झाला, तर त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा दिवा प्रज्वलित झाला.
दिवाळीच्या मंगल पर्वावर जिल्हाधिकारी पुजार यांनी ९ नोव्हेंबर रोजी रात्री मौजे पानगाव येथील पारधी वस्तीला भेट दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून पिढ्यानपिढ्या दूर राहिलेल्या पारधी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेता याव्यात आणि प्रशासनाचा आधार त्यांच्यापर्यंत पोहोचावा, या भावनेतून ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
जिल्हाधिकारी पुजार यांनी वस्तीवरील नागरिकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या राहणीमानाची, दैनंदिन खाण्यापिण्याच्या व्यवस्थेची आणि उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या कामांची सविस्तर माहिती घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेताना प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. यावेळी पारधी समाजातील बांधवांनी आपल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
पानगाव येथील पारधी बांधव अनेक पिढ्यांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र, आजही स्वतःच्या मालकीची हक्काची जागा नसल्याची व्यथा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. पिढ्यानपिढ्या वास्तव्य करूनही हक्काच्या जागेचा प्रश्न सुटलेला नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले.

