धाराशिव : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेली १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळापासून कार्यरत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील २८० अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने २७ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या शासन निर्णयामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत करत धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत एनएचएम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.
जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि स्त्री रुग्णालयांमध्ये हे अधिकारी व कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. कोविड महामारीसह राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य मोहिमांच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली होती. या मागण्यांची दखल घेत शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



