मुंबई : काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. प्रज्ञा सातव यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात यावेळी प्रवेश केला.
विधानपरिषद आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या गटबाजीला कंटाळून त्या पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात होतं.
पक्षप्रवेशावेळी प्रज्ञा सातव यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले. दिवंगत खासदार राजीव सातव यांनी हिंगोली जिल्ह्यात विकासासाठी मोठे काम केले. त्यांचे विकासकामांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्याच्या विकासात्मक घौडदौडीत साथ देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.









