गडचिरोलीतील नक्षलवादाविरोधातील लढ्यात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. नक्षल कॅडरचा मोठा आणि जुना नेता भूपती उर्फ सोनू याने आपल्या 60 नक्षली साथीदारांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवादी चळवळीविरोधातील हे मोठं यश आहे.(61 Naxals surrender in presence of Fadnavis in Gadchiroli)
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गडचिरोली पोलीस आणि सी-60 दलाचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी या संपूर्ण मोहिमेचं प्रभावी नेतृत्त्व केलं. विकासकामांच्या माध्यमातून नक्षल्यांची नवीन भरती बंद करण्यात यश आले, यामुळे या मोहिमेला मोठी ओहोटी लागलेली पाहायला मिळाली, असेही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सक्रिय झाले होते. तरुणांच्या डोक्यात व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला होता. संविधानाच्या चौकटीत आपल्याला न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे ही व्यवस्था उलथून टाका आणि जंगलातून राज्य करून आपली नवी व्यवस्था तयार करा, अशा प्रकारचं स्वप्न तरुणांना दाखवण्यात आलं. अनेक तरुण या स्वप्नाला भुलले आणि या व्यवस्थेतून समता येईल, असे त्यांना वाटले. मात्र, समता केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातूनच येऊ शकते.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “माओवाद्यांच्या सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे. आज आपण भूपती यांचे आत्मसमर्पण घेतले आहे. 40 वर्षांपूर्वी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू झाले, त्यावेळी दलमची सुरुवात करणारे आणि त्याला बौद्धिक आधार देणारे भूपती होते. त्यांच्या नेतृत्वात मोठी सेना उभी राहिली.”
नरेंद्र मोदी- अमित शाह यांची रणनीती ठरली यशस्वी
नक्षलवादाच्या नायनाटासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आखलेल्या रणनीतीचे यश या आत्मसमर्पणातून सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून एक स्पष्ट रणनीती आखण्यात आली की, प्रशासन आणि विकास शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. यावेळी शस्त्र हाती घेणाऱ्या नक्षलवाद्यांसमोर दोनच पर्याय ठेवण्यात आले होते. एकतर शस्त्रे सोडून मुख्य सामाजिक प्रवाहात यावे. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर धोरण सुरू केले, ज्यामुळे देशभरातून नक्षलवादाचा नायनाट होताना दिसत आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.









