श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता आज, गुरुवारी पहाटे, भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात सीमोल्लंघन सोहळ्याने झाली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने, कुंकवाच्या उधळणीत आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.(Tulja Bhavani Mandir Simollonghan Sohala)
विजयादशमीच्या मुहूर्तावर, पहाटे श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती १०८ साड्यांमध्ये गुंडाळून भिंगार (अहिल्यानगर) येथून आलेल्या मानाच्या पालखीत विराजमान करण्यात आली. त्यानंतर देवीच्या पालखीची मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करत मिरवणूक काढण्यात आली. प्रदक्षिणेदरम्यान, पालखी पिंपळाच्या पारावर ठेवून देवीची आरती करण्यात आली.
अशी मान्यता आहे की, विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी माता आपले सिंहासन सोडून सीमोल्लंघनासाठी मंदिराबाहेर येते आणि आपल्या भक्तांना भेटते. या सोहळ्यानंतर देवी पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती.
संपूर्ण मंदिर परिसर कुंकवाची उधळण आणि ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता, ज्यामुळे तुळजापूर नगरीत एक मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या धार्मिक सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार,विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, तहसीलदार अरविंद बोळंगे, व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, विविध पुजारी मंडळांचे अध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.








