राज्याच्या विविध भागांतील अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला उपाययोजनांची पंचसूत्री सुचविली आहे. आपत्ती निवारणाची कामे तातडीने हाती घेतानाच नुकसानभरपाईसोबत पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करावा, पंचनाम्यासाठी मुदतीचे बंधन हटवावे, शेतकरी हिताचे निर्णय घेतानाच मानसिक व सामाजिक आधारासाठी समुपदेशन शिबिरे आणि साहित्य वाटपाचे कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहन शरद पवार यांनी राज्य सरकारला केले आहे.(Sharad Pawar on farmers)
पंचनामा प्रक्रियेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे
राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी रविवारी समाजमाध्यमांवर विस्तृत पोस्ट करीत पंचसूत्री सुचविली. आपत्तीच्या या काळात पंचनामा प्रक्रियेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे, अशी मागणी शरद पवारांनी केली. अतिवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छपरांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तूंची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशुधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी, असे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
पिकांच पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत
आपत्तीग्रस्तांना नुकसानभरपाई देतानाच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्याची सूचनाही शरद पवार यांनी सरकारला केली आहे. पिकांच पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत, फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मदत करावी. पुराने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाले आहे. या वस्तूंचाही पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात. पीकविमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावेत. खासगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी करत शरद पवार यांनी ही पंचसूत्री मांडणी केली आहे.
विशेष अधिवेशन बोलवा जयंत पाटील
राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकरी, जनावरे, घरे, जनजीवन सर्व उद्ध्वस्त झाले आहे. परंतु, सरकारकडून आवश्यक मदत होताना दिसत नाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, यासाठी विशेष राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन भरविण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र पाठवून केली आहे. शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसानभरपाई व मदत पॅकेजवर सखोल चर्चा व्हावी, भरीव मदतीचा निर्णय व्हावा यासाठी विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, असे जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.








