धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या अतिमुसळधार पावसाने जमीन खरवडून गेली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हतबल झाले आहेत. राज्याचे जलसंधारण व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्यासह तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाईल याबाबत सविस्तर माहिती दिली. (mla ranajagjitsinha patil)
तीन पद्धतीने मिळणार शेतकऱ्यांना मदत
NDRF/SDRF च्या निकषांहून अधिक मदत मिळेल
आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले असून या दरम्यान झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.सरकारने 2215 कोटी रुपयांचा मदत पॅकेज जाहीर केला आहे. हा निधी 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे. तथापि, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDRF) च्या निकषानुसार, ही मदत केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठीच मर्यादित आहे. कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टर 13600 रुपये आणि बागायती शेतीसाठी प्रति हेक्टर 27000 रुपये मदत मिळणार आहे. सरकारने तालुक्यानुसार पंचनामे पूर्ण झाल्याप्रमाणे मदत तत्काळ वितरीत करण्यात येणार आहे.
पिक विम्याच्या माध्यमातून मदत
ज्या शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहेत अशा शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले असून लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
जमीन खरवडून गेली असल्यास वेगळी मदत दिली जाईल
अतिमुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात वेगाने पाणी वाहून गेल्याने जमीन खरवडून गेली आहे . अशा परिस्थितीत शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरवडून गेलेल्या जमिनीसाठी वेगळी मदत दिली जाईल.
जीवित व वित्त हानी झालेल्यांना जिल्हास्तरावर मदत
अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे,अनेकांची जनावरे वाहून गेली आहेत त्यांना जिल्हाधिकारी स्तरावरून मदत करण्यात येणार आहे. परिणामी शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.








