विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी आज (दि.८) दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली.(Maharashtra Vidhanparishad Election)
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे उपनेते अमीन पटेल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी अधिकृत मागणी करण्यात आली.
दरम्यान, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे हे पद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास एकमत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घडामोडींमुळे विधान परिषदेत विरोधी पक्षाची आघाडी कशी राहील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.