मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे मुंबईत आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.(Raj Thakarey on manoj jarange)
मनोज जरांगे पाटील याआधी मुंबईच्या वेशीवर वाशी येथून मराठा आरक्षणाचं आश्वासन घेऊन परतले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मनोज जरांगे पाटील इथे का आले हे एकनाथ शिंदेंनाच विचारा, असे राज ठाकरे यांनी म्हटले. नवी मुंबईत जरांगे आले होते, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडे गेले होते आणि जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले होते. तरीही आज पुन्हा त्यांच्यावर ही वेळ का आली, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मनसे आपल्या संघटनेला बळकट करण्यासाठी सक्रिय झाली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीचा पहिला टप्पा पार पडला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना निवडणुकांची जोरदार तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “निवडणुकीच्या तयारीला लागा. युती-आघाडी की बाकी काय ते नंतर सांगतो. त्यांनी मनसैनिकांना पक्षाची ताकद अधिक बळकट करण्यावर भर देण्याचे आदेश दिले. निवडणूक जिंकण्यासाठी काही महत्त्वाचे कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. यामध्ये, निवडणूक याद्यांवर काम करा, बूथ टू बूथ माणसे निवडा आणि त्यावर काम करा आणि मतदार याद्या वारंवार चाळा,’ अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.