दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मठाचे बैल कमानवेस येथील मारूती मंदीरापासून वाजत-गाजत मंदिरात आणण्यात आले. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन तुळजाभवानी मंदीरात मुख्य गाभाऱ्यासमोर बैलांची पुजा करण्यात आली.(Bailpola festival at Kulaswamini Tuljabhavani temple)
तुळजापूर शहरत बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डुल्या मारुती मंदिरात देवीचे महंत तुकोजीबुवा व चिलोजीबुवा तसेच भोपेपुजारी पाटील यांचे मानाचे बैल आल्यावर त्यांना सजविण्यात आले. पूजन झाल्यानंतर वाजत- गाजत बैलांना तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. मंदिरात बैलांचे पारंपारिक पद्धतीने तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन पूजन करण्यात आले.
बैलांना देवीचे दर्शन घालून झाल्यानंतर महंत व पुजारी बांधवांनी बैलाचे पूजन केले. त्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. वाजत गाजत बैल मठाकडे रवाना झाले. यावेळी महंत तुकोजीबुवा, व्यवस्थापक तहसीलदार, दोन्ही मठाचे सेवक, पुजारी, सेवेकरी, भाविक व कर्मचारी उपस्थित होते.
शहरात देखील शेतकऱ्यांनी आपली बैल मारुती मंदिरात आणून त्याचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवू शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढत पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पोळा सन साजरा केला.