कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्र. २ मधील पडसाळी, दारफळ (जि. सोलापूर) येथील पंपगृहाचा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.या प्रकल्पामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होणार असून, कृषी उत्पादनवाढ व शेतकरी समृद्धीच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. कार्यक्रमाला मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.(Pump House Inauguration)
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आमदार पाटील यांनी या कामाची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेचा सविस्तर आढावा घेतला.या प्रकल्पाचे उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रामदऱ्यापर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी लवकरच पोहोचणार आहे. तिथून पुढे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बंद पाइपलाइनद्वारे हे पाणी नेण्याचा प्रयत्न आहे.
१९९९- २००० साली माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी हा विषय प्रामुख्याने मांडला होता. त्यांच्या आग्रहामुळे आणि हा विषय लावून धरल्यामुळेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पाण्याला मंजुरी मिळाली.
या कार्यक्रम प्रसंगी संबंधित अधिकारी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पासाठी आपली जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.