अंतरवली सराटी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलेले दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आयोजित राज्यव्यापी बैठकीत ‘चलो मुंबई’ची हाक देत पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवालीहून निघून २९ ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मुंबई गाठण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे.
“आता रणभूमीत उतरायचं, लढायचं आणि विजय मिळवल्याशिवाय परतायचं नाही,” असा निर्धार व्यक्त करत जरांगे पाटील म्हणाले की, “ही लढाई आरपारची आणि अंतिम असेल.” या बैठकीसाठी मराठवाड्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
“जातीसाठी एकजूट कशी करायची हे तुम्ही देशाला दाखवून दिलं. लाखो मराठे एकत्र आले आहेत, आता कोणतीही शक्ती विजयापासून रोखू शकत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भात जरांगे यांनी सांगितले की, “५८ लाख नोंदी मिळाल्या असून, चार कोटी मराठा समाज आधीच आरक्षणात गेला आहे. फक्त ७-८ टक्के समाज बाकी असून, त्यांच्यासाठी ही अंतिम लढाई आहे.”