मुंबई : भारत सरकारने ६ जून २०२५ रोजी राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ईद अल-अधा (बकरी ईद) च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा दावा या सोशल मिडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे.
देशाच्या अनेक भागांमध्ये ईद अल-अधा (बकरी ईद) ६ जून रोजी साजरी होण्याची अपेक्षा असली तरी, त्या तारखेला देशभरात कोणतीही सुट्टी जाहीर केलेली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, फक्त कोची आणि तिरुवनंतपुरम येथील बँका ६ जून रोजी बंद राहतील. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह इतर बहुतेक शहरांमध्ये बँका खुल्या राहतील, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून देण्यात आले आहे.
शाळा, महाविद्यालये आणि राज्य सरकारी कार्यालयांसाठी ईदच्या सुट्ट्या प्रदेश आणि स्थानिक शासकीय निर्णयांनुसार बदलतात. केंद्र सरकारकडून ६ जून हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.