इयत्ता पहिलीपासून तीन भाषांची सक्ती करण्याचा निर्णय नवीन शैक्षणिक धोरणानूसार घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात याआधारावर मराठी, इंग्रजीसह हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणुन सक्तीने शिकवली जाणार होती. मात्र यास मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. मात्र नवीन शैक्षणिक वर्षात हिंदी शिकवली जाण्याची शक्यता दिसत असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअऱ करत सरकारला धारेवर धरले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मिडीया हँडलवर शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांना उद्देशून पोस्ट करत लिहीले आहे की,
सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं.
मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ?
आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरु झाली असल्याची महाराष्ट्र सैनिकांची माहिती असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. असं काही घडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.