बंगळुरुमध्ये आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमच्या मिरवणुकीदरम्यान काल झालेल्या दुर्घटनेनंतर आरसीबी टीमकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आरसीबीच्या विजयी मिरवणुकीला मोठ्याप्रमाणावर गर्दी झाल्याने ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर ३० पेक्षा अधिक जण जखमी आहेत. या घटनेनंतर आरसीबीकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आरसीबी टीम फ्रेंचायसीकडून या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच या दुर्घटनेतील जखमींना मदत मिळावी म्हणुन आरसीबी केयर्स नावाने एक फड तयार करण्यात येणार आहे.
याबाबत आरसीबी टीम फ्रेंचायसीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, बंगळुरुमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आरसीबी कुटुंबाला वेदना झाल्या आहेत. या चाहत्यांचा आदर आणि त्यांच्या निष्ठेचे प्रतीक म्हणुन मृतांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करत आहोत. या दुःखात आम्ही एकत्र आहोत.
तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या आरसीबी टीमच्या स्वागतासाठी बंगळुरूमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल आहे.