बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या आयपीएल २०२५ च्या ऐतिहासिक विजयानंतर बंगळुरू येथे आयोजित विजयी मिरवणुकीदरम्यान एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी आरसीबीच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे परिस्तिती हाताबाहेर गेल्याचे समजते आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या गर्दीमध्ये १० जण जखमी तर २ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विजय मिळवत आरसीबीने तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जेतेपद पटकावले आहे. हा विजय साजरा करण्यासाठी हजारो चाहत्यांनी आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. परंतु अपुऱ्या व्यवस्थापनामुळे याठिकाणी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी बेंगळुरूत विधानसौधापासून चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बेंगळुरू पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मिरवणूक रद्द केल्यानंतर मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमबाहेर जमले, ज्यामुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी झाली असे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.