दुष्काळमुक्त महाराष्ट्र हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या न्याय हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळवून दिल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही. समुद्रात वाहून जाणारे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पाणी मराठवाड्यात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला आहे. त्यासाठी जागतिक बँकेचे सहकार्य घेतले जात आहे. आता महाराष्ट्र बदलत आहे. तो थांबणार नसल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. (Lower Terna Lift Irrigation Scheme)
हक्काचे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळेच
निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरूस्ती कामाचे भूमिपूजन ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे तेरणा उपसा सिंचन योजनेचे शिल्पकार आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामुळेच कृष्णा खोर्यातील हक्काचे पाणी मराठवाड्यासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ज्या तळमळीने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अविरत काम केले, तीच तडफ अभ्यासू, कर्तबगार आणि धडाडीचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांच्या ठायी आहे. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच अशक्यप्राय असलेली निम्न तेरणा उपसा सिंचन योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. आम जनतेच्या अडचणी दूर करणे हे आपल्या महायुती सरकारचे काम आहे. पुढच्या ऑगस्टपर्यंत ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात यावी – आमदार राणाजगजितसिंह पाटील
तत्पूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेकरिता बंद पाईपलाईन मंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली. निधीची तरतूद आवश्यकतेप्रमाणे करून वर्षभरात हे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी नमुद केले. करजखेडा येथील पंपगृहात फ्लोटींग सेालार व्यवस्था करण्याची मागणीही यावेळी आमदार पाटील यांनी केली. जिल्ह्यात ३३ मोठ्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. त्यातून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही. तसेच कॅनॉल सिमेंट लाईन साठीही निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आमदार पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी आमदार श्री. प्रवीण स्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन श्री. अरविंद गोरे, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन श्री. सुरेशभाऊ देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. नेताजी पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे, मजूर फेडरेशन चेअरमन सतीश दंडनाईक यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.