धाराशिव : जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीमध्ये साकारत असलेल्या टेक्निकल टेक्सटाईल पार्कचे काम नुकतेच सुरू झाले असून स्थानिक तरुणांना यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्याच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे. हे लक्षात आल्यानेच विरोधकांकडून पत्रकार परिषद घेऊन सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली आहे.
विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या पोटदुखीचे खरे कारण जिल्ह्यात सुरु असलेली विकासकामे हेच असल्याचं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेसाठी निधी मंजूर झाला आहे, टेक्निकल टेक्स्टाईलसारखा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागला आहे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प पुर्णत्वास जात आहे, तुळजापूर विकास आराखड्यास अंतिम मान्यता मिळाली आहे. याचाच विरोधकांना त्रास होत असल्याचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडे ना दृष्टीकोन आहे, ना दूरदृष्टी.. फक्त टिका करणे आणि दिशाभूल करणे हेच यांचे कार्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ड्गग्जचे समुळ उच्चाटन करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकाराने त्याप्रकरणात कारवाई झाली. पोलीस योग्यरित्या कारवाई करत असून विरोधकांकडून मात्र वारंवार या गंभीर सामाजिक प्रश्नाचे राजकारण केलं जात आहे. त्यांना जनतेच्या हिताची काळजी असेल, तर पदाचा उपयोग जनहितासाठी करावा, आप्तस्वकियांच्या फायद्यासाठी नाही, असंही कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
एका कुटुंबाचा सतत विरोध करणे आणि त्यालाच आपले सर्वोत्कृष्ट काम म्हणणे म्हणजे विकास नाही. लोकांनी तुम्हाला जनहिताची कामं करण्यासाठी निवडून दिलं आहे. केवळ एका कुटुंबाबद्दल टिका करण्यासाठी आणि आकस बाळगण्यासाठी नाही, अशा कडक शब्दात दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विरोधकांना सुनावले आहे.