धाराशिव : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांची विक्रमी बहुमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील ५५ सदस्यांपैकी ४५ सदस्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच उपाध्यक्षपदी सौ. उषा रविंद्र गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकाल पार पडून जवळपास महिन्याभरानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवड आज (ता. १३ मार्च) पार पडली. यावेळी गेल्या ३२ दिवसांपासून सहलीवर असलेले महायुतीचे सदस्य मतदानासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत उपस्थित झाले. आज सकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने तेर गटातील विजयी सदस्य अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्ष पदासाठी कदेर गटातील विजयी उमेदवार उषा रविंद्र गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता.
महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाच्या शिरढोण गटाच्या सदस्य कांचनमाला संगवे आणि उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या कवठा गटाचे सदस्य महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता.
यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले. भाजपचे १९, शिवसेनेचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य असं ४० सदस्यांचे बळ महायुतीच्या पाठीशी असले तरी ऐनवेळी विक्रमी ४५ मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळाले. महायुतीच्या विरोधात ९ मतं तर एक सदस्य अनुपस्थित होते.





