केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सुरक्षा प्रोटोकॉल तोडल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी कुणालाही न सांगता मागील 9 महिन्यांत 6 वेळा गुप्तपणे परदेश दौर्यावर गेलेत. ‘सीआरपीएफ’ने याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या काळात ते इटली, व्हिएतनाम, दुबई, कतार, लंडन आणि मलेशिया दौरा केला, असे त्यांनी सांगितले.(Rahul Gandhi security breach)
‘सीआरपीएफ’ने याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. अशाप्रकारची चूक व्हीव्हीआयपी सुरक्षेला कमकुवत करते. त्याशिवाय यातून धोक्याचा सामनाही करावा लागू शकतो, असे या पत्रात म्हटले आहे. याआधीही ‘सीआरपीएफ’ने हा मुद्दा उचलला होता. येलो बुक प्रोटोकॉलनुसार, उच्चस्तरीय श्रेणीतील सुरक्षा मिळालेल्या लोकांना त्यांच्या हालचालींबाबत सुरक्षा विंगला आधी सूचना द्यावी लागते. जेणेकरून पुरेशी व्यवस्था निश्चित केली जाईल. त्यात परदेश दौर्यांचाही समावेश असतो. ‘सीआरपीएफ’चे व्हीव्हीआयपी सिक्युरिटी हेड सुनील जून यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले. त्यात राहुल गांधी त्यांच्या सुरक्षेला गांभीर्याने घेत नाहीत. बहुतांश वेळा ते कुणालाही न सांगता परदेश दौर्यावर जातात, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींचे परदेश दौरे
- 30 डिसेंबर ते 9 जानेवारी : इटली
- 12 ते 17 मार्च : व्हिएतनाम
- 17 ते 23 एप्रिल : दुबई
- 11 ते 18 जून : कतार
- 25 जून ते 6 जुलै : लंडन
- 4 ते 8 सप्टेंबर : मलेशिया
राहुल यांची सुरक्षा
राहुल गांधी यांना अॅडव्हान्स सिक्युरिटी लाईजन कव्हरसह उच्च दर्जाची झेड प्लस सिक्युरिटी आहे. झेड प्लस सिक्युरिटीत 55 सुरक्षा जवान तैनात असतात. त्यात 10 पेक्षा जास्त ‘एनएसजी’ कमांडो असतात. त्याशिवाय इतर ‘सीआरपीएफ’ आणि स्थानिक पोलिस असतात.